- दुचाकीस्वार जागीच ठार ; पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी
निपाणी : निपाणी-मुडगोड मार्गावरील देवचंद कॉलेजजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारमधील दोघेजण घटनास्थळावरून पसार झाले असून, उर्वरित दोघांना संतप्त नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोडणी गावातील शिवाजीराव प्रभाकर शिंदे (वय ३३) यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी नीता शिंदे (३०) आणि मुलगा श्रवण (९) गंभीर जखमी झाले असून, मुलगी राधिका (१२) किरकोळ दुखापतींसह बचावली आहे.
शिवाजीराव शिंदे हे निपाणीतील बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्री व्यवसाय करत होते. रविवारी सुट्टी असल्याने पत्नी आणि दोन मुलांसह ते निपाणीतील नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण उरकून कोडणीकडे परतत असताना सावंतवाडीहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने हालसिद्धनाथ सर्व्हिसिंग सेंटरसमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाजीराव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. मुलगा श्रवणच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून पत्नीचा उजवा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कोडणी गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री शिवाजीराव यांचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलगा श्रवण यांच्यावर सध्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृताच्या बहिणी सुजाता राजेंद्र परीट यांनी तक्रार दिली आहे. अपघातानंतर फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत शिवाजीराव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे.








