• रायबाग शहरातील घटना

रायबाग : नागपंचमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच रायबाग शहरातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाला. नागपंचमीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत महिलेची ओळख पटली असून सत्यव्वा शिवानंद शिंगे (वय ४३ रा. रायबाग डॉ. बी. आर. आंबेडकर नगर) असे तिचे नाव आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागावा यासाठी सत्यव्वा सोमवारी नेहमीप्रमाणे शेतात कचरा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.

शेतात काम करत असताना अचानक विषारी सापाने त्यांना दंश केला. सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सत्यव्वा यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नागपंचमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे रायबाग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेची नोंद रायबाग पोलीस ठाण्यात झाली आहे.