बेळगाव / प्रतिनिधी
संततधार पावसामुळे शहर परिसरात बऱ्याच ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली आहे. पोस्टमन सर्कल कडून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक झाड पडून काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. बेळगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत होता. दिवसभर अधूनमधून पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे विविध ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी जमा झाले होते. जोरदार पावसामुळे अनेक वेळा बाजारपेठेतील वर्दळही कमी झाली होती. शहरात दिवसभर गारठा कायम होता. सतत पाऊस सुरू असल्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.
यंदा जूनच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा सतत सुरू असलेल्या पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात देखील वाढ झालेली आहे. सोमवारीही रात्रीपासून पाऊस सुरू होता. मंगळवारी पहाटे चार पासून जोरदार पाऊसही पडत होता. यामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. शहरात कॉलेज रोड, मारुस्ती गल्ली, गणपत गल्ली आदी ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. पाऊस गेल्यानंतर ते पाणी ओसरत होते. गत काही दिवस पावसाची संततधार कमी होती. मात्र, मंगळवारी पहाटे पावसाने गती वाढविली. त्यामुळे पाणीच पाणी जमा झाले होते. सतत हवेत गारठा असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतवडीत देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे.