• दहा गावांचा संपर्क तुटण्याची भीती
  • वाहतुकीला धोका ; तातडीच्या दुरुस्तीची मागणी

खानापूर : तालुक्यातील मडवाळ – हलशी मार्गावरील नाल्यालगतचा रस्ता मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या मार्गावरील सुमारे दहा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे मडवाळ–हलशी रस्त्यालगतच्या नाल्याच्या बाजूचा भाग कोसळू लागला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीही या रस्त्याची एक बाजू खचली होती. यंदा दुसऱ्या बाजूनेही धूप सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

या मार्गावरून मडवाळ, हलशी, देवराई, घोटगाळी, रेडेकुंडी, तारवाड, रंजनकोडी, शिवठाण यांसह सुमारे दहा गावांची वाहतूक होते. रस्ता आणखी खचल्यास या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली असून, कोणत्याही क्षणी वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब देसाई, महादेव फटाण आणि स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून नाल्यालगत कायमस्वरूपी मजबूत रस्ता उभारावा, असा आग्रहही नागरिकांनी धरला आहे.