- सुदैवाने जीवितहानी टळली
- शहापूरातील नाथ पै चौक परिसरातील घटना
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शहापूर परिसरातील नाथ पै चौकाजवळ असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सततच्या पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाला होता. तसेच पावसाचे पाणी भिंतीतून झिरपल्याने तिची मजबुती कमी झाली आणि अखेर संरक्षक भिंत अचानक कोसळली.
या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी सिद्धार्थ बोर्डिंगच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सततच्या पावसामुळे जुन्या आणि धोकादायक इमारती तसेच संरक्षक भिंतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.







