• सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजन
  • मराठा – मराठी भाषिकांना बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बेळगावातील मराठा समाजाने समर्थन दर्शविले आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथून धर्मवीर संभाजी चौकपर्यंत मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात मराठा आणि मराठी भाषिक नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी शंभू जत्तीमठ येथे मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. मराठा समाज हा आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. महाराष्ट्रासह बेळगावमध्येही मराठा समाजाची हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात झालेल्या मराठा मोर्चांवेळी बेळगावच्या मराठा समाजाला सामावून घेण्यात आले होते. त्यामुळे मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावमधील एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. बेळगावमधील मोर्चा झाल्यानंतर मुंबईला जाण्याचा विचार केला जाणार आहे. तसेच ओबीसींना आरक्षण देतेवेळी मराठा समाजाने पूर्णपणे सहकार्य केले होते. तसेच सहकार्य ओबीसी समाजाने आता मराठा समाजाला करावे, कोणीही मराठा समाजावर आगपाखड करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडूसकर, मोतेश बार्देशकर, डी. बी. पाटील, अनिल आमरोळे, आनंद आपटेकर, नेताजी जाधव, संजय मोरे, अनिल पाटील, शिवराज पाटील, विलास घाडी यासह इतरांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. वाय. घाडी, बाबू कोले, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, सुनील जाधव, रावजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.