बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित दरोड्याच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, हा प्रकार दरोड्याचा नसून घरातल्याच व्यक्तीने केलेली चोरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मूडलगी तालुक्यातील कौजलगी गावात ७ जूनच्या पहाटे एक चकित करणारी घटना घडली. पार्वतेव्वा हळ्ळूर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घुसून झोपलेल्या व्यक्तींवर तिखट फेकल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास १९ लाख रुपये किमतीचे सुमारे १९१ ग्रॅम सोने चोरीला गेल्याचेही नमूद करण्यात आले होते. या कथित दरोड्याचा तपास करत असताना पोलीसांना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे पार्वतेव्वा आणि त्यांच्यासोबत झोपलेला बहिणीचा मुलगा लोकेश यांनी दिलेली माहिती परस्परविरोधी होती.

लोकेशने आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला, तर पार्वतेव्वा यांनी वेगळेच विधान केले. तपास अधिक खोलात घेतल्यानंतर खरा गुन्हेगार समोर आला. तो दुसराच कोणी नसून, दत्तक मुलाप्रमाणे घरात वावरत असलेला लोकेश होता. त्यानेच चोरी केली असून ही घटना दरोड्यासारखी भासवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून चोरी गेलेले सर्व सोने हस्तगत करण्यात आले आहे. लोकेश सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.