• एसआयआर प्रक्रियेत सकल मराठा समाजाचे आवाहन

बेळगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेत समाजातील एकही मतदार वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी आवश्यक माहिती वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सकल मराठा समाज, बेळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक सरकारतर्फे राज्यभर विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) अभियान राबविण्यात येत असून, या अंतर्गत मतदार याद्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती तसेच पत्त्याची अचूक नोंद या प्रक्रियेत केली जात आहे.

मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहावा तसेच भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत संबंधित शासकीय प्रतिनिधींकडे सादर करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मतदार यादीतील नावे अचूक राहणे, शासकीय नोंदी अद्ययावत ठेवणे आणि समाजाची अधिकृत लोकसंख्येची माहिती योग्य प्रकारे नोंदवली जाणे, या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे.

समाजातील सर्व मराठा बांधवांनी संबंधित एसआयआर फॉर्म काळजीपूर्वक भरून आपल्या भागातील बीएलओ (Booth Level Officer) यांच्याकडे अथवा संबंधित कार्यालयात वेळेत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी सकल मराठा समाजाच्या जनसंपर्क कार्यालय, गुडशेड रोड, बेळगाव येथे संपर्क साधावा किंवा समन्वयक किरण जाधव यांच्याशी ९४४८१ ३५८०७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही निवेदनात म्हटले आहे.