• रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की, सध्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एसआयआर (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादी दुरुस्ती व अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक नागरिकाने मतदार यादीतील आपले नाव अचूक आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.

ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, त्यांनी आवश्यक अर्ज भरून तातडीने नाव नोंदणी करून घ्यावी. तसेच २००२ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या नागरिकांनीही आपली माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे योग्य प्रकारे सादर करून आवश्यक फॉर्म भरावेत, जेणेकरून मतदार यादीतील माहिती अचूक आणि अद्ययावत राहण्यास मदत होईल.

मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या प्रक्रियेला गांभीर्याने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.