- बेळगावातील विभागीय आढावा बैठकीत प्रभारी सचिवांचे निर्देश
बेळगाव : जिल्ह्यात राबविण्यात येणारी मतदार यादी पुनरिक्षण मोहीम पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आढावा बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित या बैठकीत विविध सरकारी विभागांच्या कामकाजाचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले सहकार तसेच जिल्हा प्रभारी सचिव संजय शेट्टणवर यांनी ३० जून ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या पुनरिक्षण मोहिमेची माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, मतदार यादीसंदर्भातील मॅपिंगच्या कामात जिल्ह्याने आतापर्यंत ९३ टक्के प्रगती साधली असून उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बैठकीत मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. तसेच पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा होईल, याची खात्री करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
या प्रसंगी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








