• राकसकोप धरणातून विसर्ग वाढल्याने वाहतूक ठप्प
  • शेकडो एकर शेतीत पाणी

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कंग्राळी खुर्द येथील जुना पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, परिसरातील काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

सततच्या पावसामुळे राकसकोप धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर मार्कंडेय नदीला पूर आला असून, कंग्राळी खुर्द येथील जुना पूल यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा जलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी नदीकाठावरील शेकडो एकर शेतीत शिरले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास मार्कंडेय नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.