- सहा जण अटकेत ; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त
- पाच आरोपी फरार
बेळगाव : तालुक्यातील मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली. या कारवाईत ₹२३ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, पाच आरोपी फरार झाले आहेत.
२७ जुलै रोजी नागेश भरमशेट्टी यांच्या फार्महाऊसजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मारिहाळ पोलीस ठाण्याचे एचएसआय मंजुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत महांतेश बंबरगी, इस्माईल देसाई, रमेश नायक, सिद्धाप्पा भद्रशेट्टी, प्रकाश गस्ती आणि नागाप्पा बागराई यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, जुगार अड्डा चालवणारा अशोक बागराई याच्यासह अर्जुन, भीमाप्पा, किरण आणि गंगाप्पा हे पाच जण पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मारिहाळ पोलीस पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.








