• शिक्षक भरतीतील अन्यायाविरोधातील लढ्याला यश
  • मराठी माध्यमासाठी २०० शिक्षक पदांना मंजुरी

बेळगाव : कर्नाटक सरकारने प्राथमिक शाळांमधील १५ हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करताना मराठी आणि उर्दू माध्यमातील उमेदवारांसाठी पदे जाहीर न केल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेत प्रशासनाकडे निवेदने सादर करून मराठी उमेदवारांच्या हक्कासाठी आवाज उठविला.

या मागणीसाठी सीमाभागात व्यापक पाठपुरावा सुरू असतानाच खानापूरचे गणपती बावकर आणि मोहन पाटील यांनी बेंगळुरू येथे आठ ते दहा दिवस मुक्काम करून विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. शिक्षक भरतीतील मराठी माध्यमाचा प्रश्न विधानसभेत मांडला जावा, यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

शिक्षक भरतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ कन्नड माध्यमाच्या शाळांमधील रिक्त पदांची घोषणा करण्यात आली होती. मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या शाळांमधील रिक्त जागांचा विचार करण्यात न आल्याने हा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांमध्येही शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी लावून धरली.

या सातत्यपूर्ण आंदोलनाची आणि पाठपुराव्याची दखल घेत कर्नाटक सरकारने अखेर मराठी माध्यमाच्या शाळांसाठी २०० शिक्षक पदांना मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी प्रयत्न करून शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे गणपती बावकर आणि मोहन पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे आणि चिटणीस अभिजित मजुकर उपस्थित होते.

मराठी भाषा, मराठी माध्यमातील शिक्षण आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्याचा हा सन्मान आहे, अशी भावना युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.