बेळगाव / प्रतिनिधी
इंग्रजी आणि इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेचा पर्याय कर्नाटक सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार इयत्ता दहावीसाठी आवश्यक असलेले तृतीय भाषा मराठीचे पुस्तक तयार झाले आहे. त्यामुळे तृतीय भाषा म्हणून मराठीचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार गेल्या वर्षीपासून इंग्रजी, कन्नड, ऊर्दू आदी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करता येणार आहे. इयत्ता सहावीपासून इतर माध्यमांसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी सहावी ते नववीसाठी तृतीय भाषा मराठीची पुस्तके उपलब्ध करून दिली होती. तर यावेळी मराठी सरिता या नावाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय भाषेचे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. इंग्रजी व इतर माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध आहे. याबाबतची अधिक माहिती विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय भाषा मराठीचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची निवड केलेली नाही. त्यामुळे याबाबत शाळा आणि अधिक प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असून, पालकांनीदेखील याबाबत आपल्या पाल्यांना माहिती देणे गरजेचे आहे.
बेळगाव शहरासह अनेक भागांत मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. तसेच, अनेक मराठी भाषिक विद्यार्थी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा मराठीचा पर्याय लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे इंग्रजी किंवा इतर माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तृतीय भाषा मराठीचा पर्याय निवडावा, असे मत व्यक्त होत आहे.
मराठीतील अनेक तज्ज्ञ प्राध्यापक व शिक्षकांनी तृतीय भाषा मराठी विषयाची पुस्तके तयार केली आहेत. त्यामुळे मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानांत भर पडणार असून, यापूर्वी इंग्रजी व इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदीची निवड करावी लागत होती. पाठ्यपुस्तक समिती तृतीय भाषा मराठी पुस्तक तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पाठ्यपुस्तक समितीच्या अध्यक्षपदी आरपीडी महाविद्यालयातील मराठीच्या निवृत्त प्रा. संध्या देशपांडे आहेत. तर सदस्य म्हणून सिदनाळ (ता. निपाणी) येथील शशिकांत गुरव, गोकाक फॉल्स येथील मधुकर लोहार, हुक्केरी येथील संतोषकुमार माने, अगसगे युवराज पाटील, कागवाड येथील शैलजा पाटील, कटकोळ येथील ज्ञानेश्वर मिराशी यांचा समावेश आहे. तर संपादकीय मंडळावर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. मनीषा नेसरकर, निवृत्त प्राचार्य विनोद गायकवाड आहेत.