बेंगळूर : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या हालचालींना वेग आला असताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतचा अंतिम निर्णय हा पक्ष हायकमांडच घेणार असून तो सर्वांना बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जी. परमेश्वर यांनी सांगितले की, मंत्रीपद सांभाळण्यास सक्षम असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी पदाची मागणी करणे चुकीचे नाही. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि हायकमांड यांच्याच स्तरावर घेतला जाणार आहे.

मंत्रिमंडळात काही वेळा अनुभवी मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पद्धत असते. वरिष्ठांकडून नव्या पिढीला अनुभव मिळाल्यानंतर अशा बदलांना वाव मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणीही वेगवेगळी विधाने केली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण अंतिम निर्णय हायकमांडचाच असेल. हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जागा करून देणे आवश्यक आहे आणि यावर प्रश्न उपस्थित करण्याचा विषयच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया जी. परमेश्वर यांनी दिली.