• एल अँड टी कंपनीचे अधिकारी धारेवर

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील वाढत्या पाणी समस्येवरून आज महापालिकेत झालेल्या विशेष बैठकीत जोरदार चर्चा झाली. यावेळी नगरसेवकांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू नये याकरिता पाणी व्यवस्थापनाबाबत आज बेळगाव महापालिकेत महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दूषित पाणीपुरवठा, गळती, रखडलेली पाईपलाईन दुरुस्ती आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या चर्चेत आल्या. शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, रहिवाशांना पहाटेपासून विहिरी, तलाव किंवा पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बैठकीत एल अँड टी ची कार्यक्षमता, पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहणे, पाण्याची गुणवत्ता आणि प्रकल्पाला होणारा विलंब यावर गंभीर चर्चा झाली. या समस्यांची सोडवणूक येत्या पंधरा दिवसात व्हावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दस्तूरखुद्द महापौर मंगेश पवार यांनी दिला आहे.

एल अँड टी कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी रस्ता खोदला आहे. यामुळे रस्ता मंजूर होऊनही कामाला सुरुवात झालेली नाही. सकाळी सांगितल्यानंतर संध्याकाळी टँकर पाठवला जात आहे. श्रीनगरला स्वतंत्र टँकर देण्यात यावा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नगरसेवक राजशेखर डोणी यांनी केली.

प्रभाग क्र. २६ च्या नगरसेविका रेखा हुगार यांनी आपल्या प्रभागातील पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळत आहे. पाणी पुरवठा मंडळाने लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, सध्या टँकरने पाणीपुरवठा करून समस्या सोडवली जात आहे. मात्र, हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

बसवन कुडचीचे नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी अलारवाड व बसवन कुडचीसाठी वेगळी पाईपलाईन करावी. फेब्रुवारीमध्ये काम सुरू करणार असल्याचे सांगितले होते, मात्र अद्यापपर्यंत तसे झालेले नाही. एल अँड टी कंपनी मे महिन्यापर्यंत समस्या सोडवू शकत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत आपला प्रभाग एल अँड टी मधून मुक्त करावा, अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोणी यांच्या वॉर्डात पाईप टाकून वर्षांनंतरही पाणीपुरवठा न झाल्याने त्यांनीही एल अँड टी कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तर नगरसेविका सारिका पाटील यांनी आपल्या प्रभागात वारंवार तुटणाऱ्या बोअरवेल दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ लागत असून, लवकरच नवीन बोअरवेलची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

तसेच नगरसेवक वीणा विजापुरे व नितीन जाधव यांनी दुरुस्ती व नवीन कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात संथगतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापौर व आयुक्तांनी लवकरात लवकर समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

तात्पुरत्या दुरुस्त्या करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या सुरू असलेल्या अपूर्ण प्रकल्पांमुळे जनतेची गैरसोय होत असल्याने दुसरा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी एक प्रकल्प पूर्णपणे पूर्ण करा, असा सल्ला उपमहापौर वाणी जोशी यांनी दिला.

पाण्याचे ३५ टँकर तैनात करण्यात आले असून संपूर्ण शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले.