- २,८७० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य हस्तगत
- दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मच्छे गावातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कथित मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत २ हजार ८७० रुपये रोख आणि मटक्याशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनायक आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी मटक्याचा व्यवहार चालवित असल्याच्या आरोपावरून मळमारुती नगर येथील रहिवासी भरमप्पा इरप्पा कालेरी (३४) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत जप्त केलेली रक्कम लिंगप्पा तल्लूर याच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी दोघांविरोधात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.








