- शहरातील विविध दुकानांवर अचानक छापा घालून घातक मांजा जप्त
बेळगाव : शहरात मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी प्रतिबंधित चिनी व नायलॉन मांजाविरोधात कारवाई तीव्र केली आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी शहरातील विविध भागांतील मांजा विक्रीची दुकाने आणि पतंग उडवण्याच्या ठिकाणी अचानक छापे टाकून घातक मांजा जप्त केला.
दुचाकीस्वारांसह पादचारी आणि पक्ष्यांच्या जीवाला नायलॉन मांजामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, हा या कारवाईमागील उद्देश आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात कोणी प्रतिबंधित चिनी किंवा नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.








