• प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रतिपादन
  • जीवनविद्या मिशनचा गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात

बेळगाव : “आपल्याकडे जे काही आहे ते सद्गुरूंमुळे आहे, ही जाणीव ठेवून सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आचरणात आणले पाहिजे. कोणत्याही पदाची, पैशाची, कौतुकाची किंवा मानाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने काम करणारा खरा कार्यकर्ता असतो,” असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे युवा मार्गदर्शक प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगावच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ ‘कृतज्ञता दिन’ म्हणून मराठा मंदिर सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रल्हाद वामनराव पै उपस्थित होते.

‘कृतज्ञता हीच खरी उपासना’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रल्हाद पै म्हणाले की, जीवन कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर आधारित असले पाहिजे. मनात सातत्याने कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. “कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात” हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर माणसामध्ये अहंकार वाढण्याची शक्यता असते. हा अहंकारच पुढे माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आणि शहाणपण आत्मसात करून जीवनात आनंद वाटावा, आनंद घ्यावा आणि आनंदी राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

गुरुपौर्णिमा महोत्सव तीन दिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. रविवारी सकाळी हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘संगीत जीवन विद्या’ कार्यक्रम, तसेच बाल संस्कार केंद्राच्या वतीने नृत्य व गीतांचे सादरीकरण झाले. सद्गुरूंच्या प्रतिमेचे गुरुपूजन ११ जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले. जीवनविद्या मिशनच्या परंपरेनुसार मानसपूजनही करण्यात आले.

जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रल्हाद पै यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अवयवदान आणि रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून केएलईच्या प्रभाकर कोरे रुग्णालयाला जीवनविद्या मिशनकडून सहकार्य केले जाते. याबद्दल प्रीती दोडवाड आणि डॉ. माधव प्रभू यांच्या वतीने प्रल्हाद पै यांचा सत्कार करण्यात आला. अवयवदानासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ३५० नागरिकांनी अर्ज भरले.

  • शेकडो साधकांना अनुग्रह

प्रल्हाद पै यांच्या हस्ते शेकडो साधकांना अनुग्रह देण्यात आला. यावेळी त्यांनी चांगल्या संगतीचे महत्त्व सांगत शरीराची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि सकारात्मक विचार आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले.

बेळगाव आणि परिसरात जीवनविद्या मिशनची २८ उपकेंद्रे असून, गुरुपौर्णिमा महोत्सवाला सुमारे चार हजार साधक उपस्थित होते. दिवसभर सद्गुरूंनी दिलेली विश्वप्रार्थना तसेच ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ ही प्रार्थना सामूहिकरीत्या म्हणण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवचनकार शंकरराव बांदकर, बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिरजे, सल्लागार प्रभाकर देसाई, अंतर्गत हिशेब तपासणीस तानाजी पाटील, मुंबईचे पालक ट्रस्टी विलास परब आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर आणि प्रशांत बिरजे यांनी केले.

दरम्यान, सोमवारी मराठा मंडळ पॉलिटेक्निक येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.