• दोन सराईत चोरट्यांना शहापूर पोलिसांकडून अटक
  • १.७२ लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

बेळगाव : शहरातील खासबाग परिसरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहापूर पोलिसांनी अटक करत घरफोडी प्रकरणाचा उलगडा केला आहे. घटनेनंतर काही दिवसांतच आरोपींना अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.

खासबाग येथील रहिवासी सीमा वंजारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना शहापूर पोलिसांनी मलिक खलील हुबळी (वय २६) आणि रियान मैनोद्दीन दफेदार (वय १८) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून सुमारे १ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीचे ९.११० ग्रॅम सोन्याचे तसेच २३५.३२० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, महिला उपनिरीक्षक एस. एन. बसवा आणि त्यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन करून कौतुक व्यक्त केले आहे.