- सात तोळे सोने , १.१५ लाखांची रोख रक्कम लंपास
खानापूर : खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी क्रॉस परिसरात चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे सात तोळे सोने आणि १ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे.
खानापूर-पारिश्वाड मार्गावरील कुप्पटगिरी क्रॉस येथे राहणारे सैन्यदलातील जवान दत्ता भाळेकर आणि शिक्षक ज्योतिबा होसूर यांच्या घरांमध्ये ही चोरी झाली. घरातील सदस्य बाहेर गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दत्ता भाळेकर यांच्या पत्नी दर्शना या दवाखान्यात गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडले. त्यातून आठ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. दुसऱ्या घटनेत शिक्षक ज्योतिबा होसूर यांच्या पत्नी कपड्यांच्या दुकानात गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. घरातील कपाट फोडून सहा तोळे सोने, १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि १५ हजार रुपयांची रोकड पळविण्यात आली.
घरातील सदस्य घरी परतल्यानंतर दोन्ही ठिकाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खानापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना बोलावून तपासणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
खानापूर तालुक्यात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीबरोबरच दिवसा देखील गस्त वाढवावी आणि या घरफोड्यांमधील आरोपींना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.








