- दोन महिन्यांपासून पद रिक्त
- प्रभारी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी, शिक्षक व शाळांच्या कामांवर परिणाम
खानापूर : खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षण क्षेत्रातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत समाजमाध्यमातून माहिती समोर आल्यानंतर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मंगळवारी (२२ सप्टेंबर) गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली.
यापूर्वी गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामाप्पा दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदावर अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या गट समन्वयक अधिकारी मंजुनाथ हट्टी यांच्याकडे प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती कार्यालयाचे व्यवस्थापक प्रकाश होसमनी यांनी दिली.
खानापूर तालुका क्षेत्रफळाने मोठा असून दुर्गम भागाचाही समावेश आहे. त्यातच मंजुनाथ हट्टी यांच्याकडे बीआरसीचीही अतिरिक्त जबाबदारी असल्याने तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला पूर्णवेळ देणे कठीण होत असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या एक-दोन दिवसांत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यासाठी तातडीने कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी नियुक्ती होईपर्यंत याबाबत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे धनंजय पाटील यांनी सांगितले.








