• महिलेला विजेचा धक्का
  • उघड्या विद्युत तारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • जबाबदारीवरून हेस्कॉम आणि एलअँडटी मध्ये आरोप – प्रत्यारोप

बेळगाव : शहरातील खडे बाजार परिसरातील मोनप्पा पान शॉपसमोरील उघडा खड्डा आणि त्यामध्ये असलेल्या उघड्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच ठिकाणी एका महिलेला विजेचा धक्का बसल्याची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या जबाबदारीवरून हेस्कॉम आणि एल अँड टी यांच्यात परस्पर दोषारोप सुरू आहेत. हेस्कॉमकडून कामाची जबाबदारी एलअँडटी कडे असल्याचे सांगितले जात असून, दुसरीकडे एल अँड टीकडूनही जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित विभागांमध्ये जबाबदारीवरून सुरू असलेल्या वादामुळे उघडा खड्डा आणि उघड्या विद्युत तारा अद्यापही सुरक्षित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या ठिकाणी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करून उघड्या विद्युत तारा सुरक्षित कराव्यात, खड्डा बंद करावा आणि संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.