• खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : कुपवाड येथे १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

मृत दांपत्याचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील हेब्बाळ असल्याने या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अंत्यविधी तसेच वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया, प्रवास व इतर आवश्यक बाबींवर कुटुंबीयांना अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मानवी दृष्टिकोनातून शासनाने तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच लागू असलेल्या व्हिक्टिम कॉम्पन्सेशन स्कीमअंतर्गत मिळणारी नुकसानभरपाई मृतांच्या कायदेशीर वारसांना लवकरात लवकर मिळावी, यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

केसरेकर कुटुंबीय सध्या आर्थिक आणि सामाजिक संकटातून जात असल्याने शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका समितीने मांडली आहे.