- विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले यांना धमकावल्याचा आरोप
- मराठी व्यावसायिकांना त्रास दिल्यास जनता रस्त्यावर उतरेल
- रमाकांत कोंडुसकर यांचा इशारा
बेळगाव : काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्याच्या कारणावरून बेळगावातील मराठी व्यावसायिकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप समोर आला आहे. विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले यांना हॉटेल बंद पाडण्याची तसेच परवाना रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताच मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी हॉटेल विराट येथे धाव घेत भोसले यांना पाठिंबा दर्शविला. मराठी व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यास संपूर्ण मराठी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
१ नोव्हेंबर रोजी आयोजित काळ्या दिनाच्या फेरीत कपिल भोसले सहभागी झाले होते. याचाच राग धरून काही व्यक्तींकडून त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉटेल बंद पाडण्याची आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार करून व्यवसायाचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचेही सांगण्यात आले.
यासंदर्भात बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, सीमाप्रश्नाचा लढा हा केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात असून, १९५६ पासून मराठी भाषिक दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत आहेत. या फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी होतात. कपिल भोसले हेही फेरीत सहभागी झाल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बेळगावातील व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या नियमांनुसार परवाने घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत आणि नियमानुसारच फलक लावले आहेत. असे असतानाही जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही. मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी संपूर्ण समाज ठामपणे उभा असल्याचे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने अशा प्रकारांना वेळीच आळा घालून कोणत्याही व्यावसायिकाला विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मराठी व्यावसायिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरूच राहिल्यास समस्त मराठी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सागर पाटील, गणेश दड्डीकर, सुनील बोकडे, किरण हुद्दार, शेखर तळवार, प्रवीण रेडेकर, सूरज चव्हाण, गजानन बैलुरकर, राकेश पाटील, सुमित मोरे, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम, आकाश भेकणे, राजू वर्पे, प्रियेश गौंडाडकर, जयदीप उपसकर, राजेंद्र बैलुर, श्रीपाद काकतीकर, जयेश भातकांडे, दर्शन सावगावकर आणि बळवंत शिंदोळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हॉटेल विराट येथे उपस्थित राहून कपिल भोसले यांना पाठिंबा दिला.








