उचगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या श्री वैजनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ग्रामस्थ, देवस्थान पंचकमिटी आणि सुवासिनींच्या उपस्थितीत सर्व देवतांचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सनई-ताशा, वारकरी संप्रदायाच्या गजरात देवतांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती मारुती मुचंडीकर महाराज यांचे प्रवचन, तर रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. भवताचार्य यतिराज महाराज (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी देवस्थान समितीच्या हस्ते मंदिराची वास्तुशांती, गृहप्रवेश आणि होमहवन विधी पार पडतील. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. बाळू मारुती भक्तीकर महाराज यांचे प्रवचन होणार असून, रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. गुरु पुंडलिक महाराज देहुकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज, श्रीक्षेत्र देहू) यांचे कीर्तन होईल.

शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महर्षी धर्म, तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महाराज (मुक्ती मठ) यांच्या हस्ते कळसारोहण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, विविध पूजाविधी तसेच दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच वेदशास्त्र संपन्न पुरोहित सजीव रामचंद्र जोशी आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.