बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचा १५वा दीक्षांत समारंभ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जेएनएमसीच्या केएलई शताब्दी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे हे होते. टाटा मेमोरियल सेंटरचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्यात आली. सत्कारानंतर त्यांनी जीवनात स्वतःशी स्पर्धा करत राहण्याचे महत्त्व सांगितले. भारतातील आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकत, त्यांनी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि सातत्याने शिकण्याची गरज अधोरेखित केली. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केवळ सुरुवात असल्याचं त्यांनी नमूद केले. अनुभवातून शिकत राहिले पाहिजे हाच खरा विकासाचा मार्ग आहे. पुढील दोन दशकांत आरोग्य क्षेत्रात मोठी आव्हाने येतील, त्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल असे आवाहन त्यांनी केले. तसेच या दीक्षांत समारंभात आरोग्य विज्ञानाच्या विविध विभागांतील शिक्षण पूर्ण केलेल्या १८४४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ४० पीएचडी, २९ पोस्ट डॉक्टरल पदव्या, ६६० पदव्युत्तर पदव्या, १०८० पदवी पदव्या, ९ पीजी डिप्लोमा, ११ डिप्लोमा, ४ फेलोशिप आणि ११ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या पदव्यांचा समावेश होता.
एकूण ३५ विद्यार्थ्यांनी ४६ सुवर्ण पदके पटकावली, ज्यात २८ विद्यार्थिनी आणि ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केएलड बी.एम.कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. श्वेता राजशेखर गोरे हिने आयुर्वे द पदवीमध्ये ४ सुवर्ण पदके मिळवली, तर जेएन वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. करमुडी प्रत्युषा हिने वैद्यकीय पदव्युत्तर पदवीमध्ये ३ सुवर्ण पदके मिळवून सर्वाधिक वैयक्तिक सुवर्ण पदके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले.