- बसुर्ते धरण प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला ; ऊसाला योग्य दर जाहीर करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
बसुर्ते गावात धरण प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला तसेच ऊसाला योग्य भाव मिळावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले.
शेतकऱ्यांनी बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात रास्ता रोको आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बसुर्ते गावातील संपादित प्रत्येक एकर जमिनीला किमान दोन कोटी रुपयांचा मोबदला मिळावा आणि ऊसासाठी योग्य आधारभूत दर जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे.

आंदोलकांनी सांगितले की, उचगाव ग्रामपंचायती हद्दीतील बसुर्ते परिसरातील सुमारे ८० एकर जमीन जलाशय बांधकामासाठी ताब्यात घेण्यात आली, पण शेतकऱ्यांना न नोटीस देण्यात आली, न योग्य मोबदला. “८८ लाखांचा मोबदला आम्हाला मान्य नाही. एकरी दोन कोटी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
संतप्त शेतकऱ्यांनी म्हणाले, “आम्हाला पैसा नको — आमची जमीन परत द्या. धरणाचे काम वनक्षेत्रात करा, पण आमच्या शिवारात नाही. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय धरणाला परवानगी देणार नाही; जीव गेला तरी आंदोलन सुरूच राहील.”
शेतकऱ्यांनी सरकारकडे रोष व्यक्त करत विचारले की, “गुजरातमध्ये ऊसाचा दर ₹४,४५० प्रति टन, महाराष्ट्रात ₹३,५०० पेक्षा जास्त, पण कर्नाटकात शेतकऱ्यांवर अन्याय! सरकारने ९५० कोटी रुपयांचे थकित बिलही दिलेले नाही. मग मंत्री आणि आमदार गप्प का आहेत?”
दरम्यान, शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलकांशी चर्चा केली. “बसुर्ते चेक डॅम विषयावर शुक्रवारी ग्रामस्थांसोबत विशेष बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी तसेच बसुर्ते गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








