बेळगाव / प्रतिनिधी

इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीसाठी श्रीराम सेनेतर्फे आज मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मचलो इंगळीफ आंदोलन छेडण्याच्या तयारीत असलेल्या यांच्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इंगळी येथील घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक नेतृत्वाखाली आज गुरूवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करत मोर्चा काढण्यात आला.

या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवून होते. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय आवरात आगमन होताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतः जातीने मोर्चाला सामोरे गेले. यावेळी सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून इंगळी येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेसंदर्भात थोडक्यात माहिती देऊन सर्व हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.