- इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा ; मालिकेत बरोबरी
बर्मिंगहम : टीम इंडियाने बर्मिंगहम येथील दुसरी कसोटी जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील नवख्या भारतीय संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर तब्बल ३३६ धावांनी सर्वात मोठा पराभव करून बर्मिंगहममध्ये ५८ वर्षांत पहिला विजय मिळवला आहे.
या सामन्यात शुबमन गिलने एका सामन्यात ४३० धावा तर आकाशदीपने एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर मोहम्मद सिराजने ७ विकेट्स घेतले. भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचे डोंगराएवढे मोठे आव्हान दिले होते. मात्र प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २७१ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
- भारताचा पहिला डाव :
इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५८७ धावांचा मोठा डोंगर उभारला. यामध्ये गिलने ३८७ चेंडूत ३० चौकार आणि ३ षटकारांसह केलेल्या २६९ धावांचे सर्वात मोठे योगदान होते. पहिल्या डावात राहुल लवकर बाद झाला, पण यशस्वी जैस्वालने कमालीची खेळी केली. यशस्वी जैस्वालने १०७ चेंडूत १३ चौकारांसह ८७ धावांची खेळी केली. तर करूण नायर ३१ धावा करत बाद झाला होता. यानंतर रवींद्र जडेजाने ८९ धावांची खेळी करत जैस्वालबरोबर २०० धावांची भागीदारी करून मोठी धावसंख्या रचली. पहिल्या डावात इंग्लंडकडून शोएब बशीरने ३ विकेट्स, ख्रिस वोक्स, जोश टंग यांनी २-२ विकेट्स घेतसल्या. तर ब्रायडन कार्स, स्टोक्स आणि रूट यांनी १-१ विकेट घेतली.
- इंग्लंडचा पहिला डाव :
पहिल्या डावात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या दोघांनीच इंग्लंडचा बाजार उठवला. सिराजने ६ आणि आकाशने ४ विकेट्स घेत इंग्लंडला ८९.३ ओव्हरमध्ये ४०७ रन्सवर ऑल आऊट केले. त्यामुळे भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडच्या पहिल्या डावात हॅरी ब्रूक आणि जॅमी स्मिथ यांनी ३०३ धावांची विक्रमी भागीदारी रचली. तर ब्रूकने २३४ चेंडूत १७ चौकार आणि एका षटकारासह १५८ धावा केल्या. तर जेमी स्मिथ २०७ चेंडूत २१ चौकार आणि ४ षटकारांसह १८४ धावा करत नाबाद परतला.
- भारताचा दुसरा डाव :
इंग्लंडला ४०७ धावांवर ऑलआऊट करत भारताने १८० धावांची मोठी आघाडी मिळवली. यासह भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४२२ धावा करत डाव घोषित केला. दुसऱ्या डावात केएल राहुलने ५५ धावा केल्या. तर शुबमन गिलने १६२ चेंडूत १३ चौकार ८ षटकार लगावत १६१ धावांची अजून एक विक्रमी खेळी केली. तर ऋषभ पंतने वनडे स्टाईल खेळी खेळत ५८ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६ धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने ६९ धावांची शानदार खेळी केली.
- इंग्लंडचा दुसरा डाव :
पहिल्या डावातील १८० धावांच्या आघाडीसह भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान दिले होते. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. तत्पूर्वी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने इंग्लंडला ७२ धावांवर ३ झटके दिले होते. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. त्यामुळे भारताला पाचव्या आणि अंतिम दिवशी ७ विकेट्सची गरज होती. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळाला विलंबाने सुरुवात झाली. पावसामुळे सामना अनिर्णित राहतो की काय? असे वाटत होते. मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली आणि सामना सुरु झाला. यानंतर भारताने ७० षटकांतच इंग्लंडला ऑल आऊट केले.
पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. एकट्या आकाश दीप याने इंग्लंडच्या ६ फलंदाजांना गुंडाळले. तर मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत इंग्लंडला ऑलआऊट केले. इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने सर्वाधिक ८८ धावा केल्या. तर त्याव्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर ३५ पारही पोहचता आले नाही. भारताने हा विजय मिळवल्याने ५ सामन्यांची मालिका आता रंगतदार स्थितीत पोहचली आहे. आता १० जुलैला होणाऱ्या तिसर्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.