- गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी
- दोन फुटांपर्यंत खोल खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
खानापूर : खानापूर तालुक्यातील इद्दलहोंड-गर्लगुंजी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
इद्दलहोंडपासून गर्लगुंजी गावाच्या सीमेपर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अवजड वाहने तसेच विटांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सातत्याने वर्दळ असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने काही ठिकाणी तब्बल दोन फुटांपर्यंत खोल खड्डे निर्माण झाले आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
गणेशोत्सवानिमित्त या मार्गावरून नागरिक, भाविक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांची मोठी वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक आमदार आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या दुरवस्थेची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्तीची कार्यवाही करावी. अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








