बेळगाव / प्रतिनिधी

सुवर्ण विधानसौध येथे ८ ते १९ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कारणास्तव तीन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश जारी केला आहे. १ डिसेंबरपासून २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ही जमावबंदी लागू राहणार आहे.

अधिवेशनाच्या काळात कोणत्याही मागण्यांसाठी आंदोलन, निदर्शने करावयाची असल्यास पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय मोर्चे, मिरवणुका व जाहीर सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पाचहून अधिक जणांच्या गटात फिरण्यावर प्रतिबंध राहणार आहे.

याशिवाय, प्रक्षोभक घोषणा देणे, व्यक्तीचा अपमान करणारे पोस्टर, चित्रे किंवा प्रतीकांचे प्रदर्शन, तसेच लाठी, तलवार, भाला, चाकू, बंदूक यांसारखी शस्त्रे बाळगणेही पूर्णतः निषिद्ध आहे. दगड, स्फोटके, फटाके किंवा दगडफेकीची साधने घेऊन फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

हा आदेश धार्मिक मिरवणुका व अंत्यसंस्कार यांना लागू होणार नाही. मात्र लग्न किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको किंवा आपत्कालीन सेवेला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच अधिवेशन काळात अधिकृत परवानगीशिवाय ड्रोनचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.