• जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश
  • अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतली आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

येत्या ८ डिसेंबरपासून बेळगावात सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून, सर्व संबंधित समित्यांनी जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, कोणतीही त्रुटी राहू देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या.

सुवर्ण विधानसौध येथे बुधवारी (३ डिसेंबर) आयोजित बैठकीत ते बोलत होते. निवास, खानपान, वाहतूक व्यवस्था, सुरक्षाव्यवस्था यासह सर्व सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करून देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढती उपस्थिती लक्षात घेता, सुवर्ण विधानसौधात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून मिनीबसची नियोजित सुविधा उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला.

अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र फूड काउंटर आणि निवासव्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश देत, नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांनी सतत समन्वय साधून काम करावे, असे ते म्हणाले.

जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आगमनासंदर्भात शाळांकडून आवश्यक माहिती आगाऊ घेण्याचे सुचविले. तसेच इतर जिल्ह्यांतील शिक्षण विभाग उपसंचालकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून नियोजनाचा आढावा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी अधिवेशनादरम्यान सुरक्षा आणि पासेसचे वितरण यासंदर्भातील माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, आयएएस अधिकारी अभिनव जैन, अतिरिक्त उपायुक्त विजयकुमार होनकेरी, विविध उपसमित्यांचे प्रमुख आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रोशन यांनी यापूर्वी प्रमाणेच यावेळीही सर्व विभागांनी सुसंघटित आणि समन्वयाने काम करून कोणत्याही तक्रारींना वाव न देण्याचे आवाहन केले.