- जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
- अतिवेगामुळे अपघातांचा धोका
बेळगाव : हलगा-बस्तवाड मार्गावर वाढत्या वाहनांच्या वेगामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी हलगा ग्रामस्थांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राहुल शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बेळगाव-हलगा सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या हलगा-बस्तवाड मार्गावर दुचाकींसह इतर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जैन स्मशानभूमीसमोर, सुभाऊ सागर नगर कॉर्नर, कन्नड प्राथमिक शाळेसमोर, लक्ष्मी गल्लीचे पश्चिम टोक, न्यू गल्ली, बसवण्णा गल्ली आणि ओंकार नगर क्रॉस या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी राहुल शिंदे यांनी हा विषय सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित असून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी ॲड. अण्णासाहेब घोरपडे, स्नेहा घोरपडे-लाड, गणेश भाविकट्टी, शरद देसाई, रामनाथ नलावडे, महेंद्र कांबळे आणि गुरुदेव मठपती यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.








