- १० दिवसांत दर्जेदार दुरुस्ती करा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा
बेळगाव : जुन्या पी. बी. रोडवरील येडियुराप्पा मार्गावरील हरियाली हॉटेलपासून अलारवाड अंडरब्रिज सर्कलपर्यंतच्या रस्त्याची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देऊन, पुढील १० दिवसांत रस्त्याची समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली.
हलगा, अलारवाड, बस्तवाड, कोंडुसकोप्प, मास्तमर्डी, तारिहाळ, शगनमट्टी, शिंदोळी आणि बसरीकट्टी या गावांतील नागरिक दैनंदिन प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गावकऱ्यांनी यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर खड्डे तात्पुरते बुजवण्यात आले. मात्र, दुरुस्तीचे काम योग्य दर्जाचे नसल्याने पुन्हा खड्डे पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खड्डे चुकवताना वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजवण्याऐवजी या मार्गावर दर्जेदार काँक्रीट किंवा डांबरी रस्ता तयार करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
पुढील १० दिवसांत रस्त्याची समस्या सोडवली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यावेळी ॲड. घोरपडे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.







