पणजी / प्रतिनिधी

गोवा पर्यटन खात्याने राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘एकादशा तीर्थयात्रा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील अकरा प्रमुख मंदिरांना एका सुसंगत प्रवास मार्गात एकत्रित करणाऱ्या या यात्रेला आकार देण्यासाठी पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकील जीटीडीसीचे विपणन व हॉटेल विभागाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर, साहाय्यक पर्यटन संचालक जयेश काणकोणकर तसेच संबंधित अकरा मंदिर समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीची सुरूवात एकादशी तीर्थयात्रेची संकल्पना आणि नियोजन स्पष्ट करणाऱ्या सविस्तर सादरीकरणाने झाली. यात दररोज चार मंदिरांना भेट देत एकूण तीन दिवसांच्या आध्यात्मिक अनुभवाचा आराखडा मांडण्यात आला. यामध्ये पुढील अकरा मंदिरांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. श्री मंगेश मंदिर, मंगेशी, श्री महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ, श्री महादेव मंदिर, तांबडी-सुर्ला, श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे ,श्री ब्रह्मा मंदिर, सत्तरी, श्री शांतादुर्गा मंदिर, फातर्पा श्री हरी मंदिर, मडगाव, श्री दामोदर मंदिर, जांबावली, श्री परशुराम मंदिर, पैंगीणश्री महागणपती मंदिर, खांडोळा, श्री दत्तात्रेय मंदिर, साखळी अशी ही मंदिरे आहेत.