बेळगाव / प्रतिनिधी
हेस्कॉमतर्फे गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव विसर्जन मार्गासह शहरातील विविध अडचणी जाणून घेतल्या आहेत. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे, विद्या बजंत्री यांनी गुडशेड रोड, डेक्कन हॉस्पिटल, कपिलेश्वर विसर्जन तलाव, एसपीएम रोड आदी भागांची पाहणी केली. यावेळी मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी असलेल्या खांबांमुळे विसर्जन करण्यासाठी तलावावर येणाऱ्या मंडळांची अडचण होते, याची दखल घ्यावी, अशी मागणी केली. मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे विकास कलघटगी यांनी गणेशोत्सवाला अजूनकाही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले, तर उत्सवात अडचण येणार नाही. काही ठिकाणी वीज वाहिन्या खाली आल्या आहेत, त्यामुळे मूर्ती आणताना व घेऊन जाताना अडचण येऊ नये याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली. यावेळी लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, माजी उपमहापौर सतीश गौरगौंडा, रोहित रावळ, परेश शिंदे आदी उपस्थित होते.









