- सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च
- विसर्जन मिरवणुकीसाठी जलद कृती दल सज्ज
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, शनिवारी खडेबाजार आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जलद कृती दलाच्या (RAF) जवानांनी पथसंचलन केले. स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संवेदनशील भागातून हे संचलन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी RAFची १४० जवानांची तुकडी बेळगावात दाखल झाली आहे. तुकडी शहरात दाखल झाल्यापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पथसंचलन केले जात आहे.
उत्सव काळात शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान जलद कृती दलाचा वापर करण्यात येणार आहे.
RAFच्या अधिकारी आणि जवानांना बेळगाव शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच संवेदनशील ठिकाणांचा परिचय व्हावा, यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नियमित पथसंचलन केले जात आहे.
शनिवारी झालेल्या पथसंचलनात पोलीस आयुक्त प्रकाश निकम, उपायुक्त नारायण बरमणी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.








