- मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन
बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी बेळगाव पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला तब्बल ३६ तास लागल्याने यंदा मंडळांनी रात्री ८ वाजेपर्यंत मिरवणूक सुरू करून ती वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले आहे.
विसर्जनाच्या नियोजनात गणेश मंडळांनी एकमेकांशी स्पर्धा करू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बाहेरील जिल्ह्यांतून मागविण्यात आलेल्या सुमारे ५ हजार पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा मिळून ६ ते ७ हजारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ५०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शहरातील एकूण १,१०० हून अधिक कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था आणि महावितरणशी समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. तसेच कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त प्रकाश निकम यांनी केले आहे.








