बेळगाव : गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन तलाव आणि मिरवणूक मार्गावर महानगरपालिका आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील तयारीची पाहणी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह भेट देऊन केली.

कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुना आणि नवा तलाव, जक्केरीहोंड, किल्ला तलावासह पालिका हद्दीतील विविध ठिकाणी असलेल्या विसर्जन तलावांना भेट देऊन स्वच्छता, सोयी-सुविधा आणि सुरक्षा उपायांची पाहणी केली.तसेच मिरवणूक जाणाऱ्या मार्गांनाही भेट देऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.

पाहणीनंतर महापौर प्रीती कामकर यांनी, गेल्या काही दिवसांपासून कामे सुरू असून अंतिम टप्प्यातील तयारी लवकर पूर्ण करून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने विसर्जनाचे काम होण्यासाठी अनुकूलता निर्माण करावी, अशा सूचना तेथे उपस्थित पालिका आणि एल अँड टी सह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमहापौर हणमंत कोंगाळी यांनी, यापूर्वीच अनेक वेळा बैठका घेऊन विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही कामे शिल्लक असतील तर लक्ष देऊन वेळेत तयारी करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली.

पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी, तलाव परिसरात क्रेन, मंडप, ध्वनिक्षेपक, पिण्याचे पाणी यासह विविध तयारी करून, पोलीस, जीव रक्षक पथकासह विविध विभागांशी समन्वय साधावा, अशी सूचना केली.

गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि शुक्रवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पोलीस आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना शांतता, संयम आणि शिस्तीने सहकार्य करून मिरवणूक यशस्वी करावी, असे आवाहन महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी केले आहे. स्थायी समिती अध्यक्ष राजू भातकांडे, नितीन जाधव आणि इतर नगरसेवक, महानगरपालिकेचे अभियंता आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.