- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन
- जिल्हा प्रशासनाकडून गणेश मंडळांची आढावा बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे. गणेशोत्सव मंडळाने ज्या काही समस्या मांडल्या आहेत, त्यांचे निवारण येत्या काही दिवसात करण्यात येईल. सार्वजनिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत, याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने काम हाती घ्यावे, हेस्कॉमने मिरवणूक मार्गावरील विद्युत वाहिन्या, केबल्स त्वरित हटवाव्यात, महापालिकेने मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठिकठिकाणी अतिरिक्त विद्युत दिव्यांची सोय करावी, गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.
कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जिल्हा प्रशासनाकडून आयोजित गणेश मंडळांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त शुभा बी., डीसीपी नारायण बरमणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडून त्यांचे गणेशोत्सवापूर्वी निवारण करण्याची मागणी केली. याला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनानेही लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
- प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा :
शहरातील गणेश मंडळांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. सार्वजनिकांना कोणत्याही प्रकारची समस्या होऊ नये, यासाठी मिरवणूक वेळेवर संपवावी. विसर्जन करताना वेळ वाया न घालवता अर्ध्या तासात विसर्जन करून घ्यावे. विसर्जन मार्गावर अनेक हॉस्पिटल्स असून शेकडो रुग्ण तेथे उपचार घेतात. यासाठी डीजे किंवा साऊंड सिस्टीमला फाटा देण्याचे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले.
गणेश मंडळांकडून कागदपत्रांसोबत घेण्यात येत असलेल्या फोटोंचा नियम रद्द करण्यात येत आहे, गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला वेठीस धरू नये, पहिला एक सांगणे आणि नंतर एक बोलणे, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेऊ नये, यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पाहणी करून कोणकोणत्या ठिकाणी अडचणी आहेत, याची शहानिशा करण्यात आली आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवकाळात कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दि. २५, २६ आणि २७ या दिवशी गणेश मंडळांनी आगमन सोहळा पार पाडावा. या अगोदर आगमन सोहळ्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. गणेश मंडळांनी विजर्सन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या हिताची काळजी घ्यावी, विसर्जन मिरवणूक वेळेवर कशी पार पडेल, यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी, यंदा डीजेच्या आवाजावर मर्यादा येणार असून वायूप्रदूषण विभागाचे कर्मचारीही यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणूक काळात पोलीस प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून हुल्लडबाजांवरही आळा घालण्यात येणार आहे. यासाठीही विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून उपकरणांद्वारे कसून तपासणीसुद्धा केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
विसर्जनाच्या एक दिवस अगोदर विसर्जन तलावांची संपूर्ण स्वच्छता महापालिकेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. विसर्जन तलावांवर जलतरणपटूची नेमणूक करण्यात येणार आहे. गणेश मंडळांना विसर्जनासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे. काहीवेळा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विसर्जनादरम्यान हुल्लडबाजी करण्यात येते. मात्र यंदा विसर्जन तलाव परिसरात प्रशासनाकडूनच साऊंडसिस्टीमची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे यावर आळा बसणार आहे. तलाव परिसरात स्वच्छतेसाठीही सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. यावेळी गिरीश डोंगरे, सुनील जाधव, रणजित चव्हाण-पाटील यांनी विविध सूचना मांडल्या.
- रुग्णांचा विचार करा, मग साऊंड लावा :
विसर्जन मार्गावर विविध लहान-मोठी ६५ हॉस्पिटल्स कार्यरत असून शेकडो लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे रुग्ण तेथे उपचार घेत आहेत. यामुळे गणेश मंडळांनी याची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसारच डिजेचा आवाज ठेवावा. जर डीजे व साऊंड सिस्टीमच्या आवाजात वाढ केल्यास रुग्णांना याचा मोठा धोका उद्भवू शकतो. काही रुग्ण हृदय विकाराने ग्रस्त तर काही रुग्ण विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. याचा विचार करून गणेश मंडळांनी डीजे किंवा साऊंड सिस्टीम लावावा. कारण आवाज वाढल्यास याचा थेट परिणाम हृदयावर होत असून आयुक्त बोरसे यांनी विविध राज्यातील डिजे व साऊंड सिस्टीमुळे मरण पावलेल्यांची घटना पुराव्यानिशी सादर केली.