- पूजासाहित्य, मखर, विद्युत रोषणाई, कपडे यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग
- शहरातील वाहतुकीवरही परिणाम
बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी शहर आणि उपनगरांतील प्रमुख बाजारपेठा व रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले. गणेश चतुर्थी आणि हरितालिकेच्या पार्श्वभूमीवर पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाई, नवीन कपडे यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
गणेश चतुर्थी आणि हरितालिका उद्या सोमवारी (ता. १४) एकाच दिवशी आल्याने खरेदीसाठी शहरात विशेष लगबग दिसून आली. बेळगावसह कोकण, चंदगड, गोवा आणि सीमाभागातील विविध गावांमधून नागरिक खरेदीसाठी शहरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.
पांगुळ गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आणि मारुती गल्ली याचबरोबर उपनगरातील खडे बाजार, शहापूर परिसरातही दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
गणेशमूर्ती स्थापनेसाठी लागणारे पूजासाहित्य, फुले, हार, पत्री, रंगीबेरंगी मखर, आकर्षक विद्युत माळा, लायटिंग आणि तोरणांना मोठी मागणी होती. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी विविध आकारांचे आणि आकर्षक डिझाईनचे मखर, फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. हरितालिकेसाठी आवश्यक पूजासाहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
गेल्या दोन दिवसांतील मोठ्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली.








