बेळगाव / प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची त्वरित भरपाई करावी, कर्ज माफ करावे, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपीऐवजी करातून मिळणारे रू. २०००/- थेट खात्यात जमा करावे, अशा विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने मोठी रॅली काढण्यात आली, आणि बेळगावमध्ये आगमन झालेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देण्यात आले.

अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, सोयाबीनसह इतर अनेक पिकांचे नुकसान झाले आहे, आणि यासाठी त्वरित भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत साखर कारखाने ऊस गाळप हंगाम सुरू करणार असल्याने, शेतकऱ्यांना एफआरपी देण्याऐवजी करातून मिळणारे रू. २०००/- थेट खात्यात जमा करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. याशिवाय तलाव भरणे, गाळ काढण्याची योजना, पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा, शेतकऱ्यांना त्रास देणारे कायदे मागे घेणे आणि सुवर्णसौध येथे सचिव स्तरावरील कार्यालयांचे स्थलांतर यासंबंधी तातडीने कारवाई करण्याची मागणीही केली आहे. कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची मागणी देखील केली.

यावेळी प्रकाश नाईक, सत्यप्पा मल्लापुरे, चुनप्पा पुजारी, सुभाष शिरगूर, किशन नंदी, रमेश वाळी, बाबूगौडा पाटील, गंगाधर मेटी, कुमार मरडी यांच्यासह इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.