- बेनकनहळ्ळी येथील गजानन पाटील यांचा आगळावेगळा उपक्रम चर्चेत
बेनकनहळ्ळी / वार्ताहर
बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम राबविला. गायीला आपण ‘गोमाता’ म्हणतो चक्क त्याच गायीचे डोहाळे पुरवित पारंपरिक शेती व्यवसाय करणारे सुभाष गल्ली येथील गजानन निंगाप्पा पाटील यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गजानन पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी एक गाय खरेदी केली होती. दोन वर्षांपूर्वी तिने एका गोंडस वासराला जन्म दिला, ज्याला त्यांनी हौसेखातर ‘थार’ असे नाव दिले. सध्या ही गाय नऊ महिन्यांची गाभण असल्यामुळे रविवार (दि. २६ ऑक्टोबर) तिचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी जनावरे ही केवळ उपजीविकेचे साधन नसतात, तर ती कुटुंबाचा भाग बनतात. ‘थार’ गायीबद्दलही पाटील कुटुंबाची अशीच भावना आहे. आता संपूर्ण पाटील कुटुंबीयांना तिचा लळा लागला आहे. घरातील सदस्याप्रमाणे तिचे संगोपन करून त्यांनी तिच्या बाळंतपणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या दिवशी गायीला अंघोळ घालून फुलांनी सजवण्यात आले होते. घरासमोर मंडप, रांगोळी आणि सजावट करून वातावरण उत्साहाने भारावून गेले होते. उपस्थित सुवासिनींनी गायीला ओवाळून तिच्या ओटीत साडी, फळे, मिठाई अर्पण केली. पंचपक्वानांचा नैवेद्य ठेवण्यात आला, तर पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


याप्रसंगी गजानन यांच्या आई – वडिलांनी पाळण्याची गाणी सादर केली. महिलांनी ‘थार’सोबत फोटो सेशनही केले. काहींनी गायीला साडी-चोळी भेट देत आहेर दिला. संपूर्ण सोहळा घरातील कन्येच्या डोहाळे जेवणाइतकाच उत्साहात पार पडला. सध्या पाटील कुटुंबियांच्या या उपक्रमाची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. गोमातेप्रती असलेले प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करत त्यांनी दिलेला हा संदेश सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.







