- शिवकालीन मर्दानी खेळ, लेझिम आणि ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत
- हजारो गणेशभक्तांची उपस्थिती
बेळगाव : आधुनिकतेच्या धावपळीला बाजूला सारत पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत खडक गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. कोणताही डीजे किंवा डॉल्बी न वापरता शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपरिक वाद्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तरुणांनी सादर केलेल्या या अनोख्या पारंपरिक मिरवणुकीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
खडक गल्लीतील गणरायाचे आगमन छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कलपासून सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड-केळवडी येथील लेझिम पथकाने सादर केलेल्या लयबद्ध खेळाने मिरवणुकीत रंगत आणली. लेझिमच्या तालावर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
साताऱ्याहून आलेल्या मर्दानी साहस क्रीडा संघाने शिवकालीन परंपरेची आठवण करून देणाऱ्या थरारक कसरती आणि मशालींचे प्रदर्शन सादर केले. या साहसी खेळांनी गणेशभक्तांची मने जिंकली.
माजी आमदार अनिल बेनके यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, तो उद्देश अशा उपक्रमांमधून सार्थ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉल्बीला बंदी असताना मंडळांनी शिवकालीन वाद्ये आणि मर्दानी खेळांना दिलेले प्राधान्य भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवानिमित्त सोमवारनंतर कर्नाटकासह गोवा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक बेळगावमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव हा परस्पर सामंजस्याने आणि कोणत्याही मतभेदांना व क्षुल्लक तक्रारींना थारा न देता साजरा करावा, असे आवाहन अनिल बेनके यांनी केले. त्यांनी देशातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
या आगमन सोहळ्यात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर, भरत पाटील, भाजप नेते मुरुगेंद्र गौडा पाटील, युवा नेते सुनील जाधव यांच्यासह विविध मान्यवर आणि हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते.








