बेळगाव / प्रतिनिधी
पुढील महिन्यात बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व उपसमित्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. अधिवेशनादरम्यान सुरक्षा, वाहतूक, आरोग्य, भोजन आणि संपर्क सेवांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व कठोर सूचना दिल्या.
या अधिवेशनाचे आयोजन मागील वर्षाप्रमाणेच उत्कृष्ट व्हावे, या उद्देशाने विविध उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीने आपल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन करून कोणतीही त्रुटी राहू नये, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. ते सुवर्ण विधानसौध येथे घेतलेल्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अधिवेशनाच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पोलिस विभागाच्या समन्वयाने अधिकारी, कर्मचारी आणि मार्शल यांच्यासाठी प्रवेश पासचे वाटप करावे, तसेच सुवर्ण विधान सौधच्या तळमजल्यावर स्वतंत्र भोजन व्यवस्था आणि बाहेर सशुल्क कँटीन सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.
तसेच संभाव्य आंदोलन स्थळे निश्चित करून तिथे पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या निवासस्थानाजवळ वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेशही देण्यात आले. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहनांची तांत्रिक तपासणी करून घ्यावी आणि अधिवेशनादरम्यान फोन व इंटरनेट सेवा अखंडित राहील, याची खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांसाठी पास वाटप करताना आवश्यक ओळखपत्र तपासण्याचे आणि सुवर्ण विधान सौध परिसरात येणाऱ्या वाहनांची नीट तपासणी करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अभिनव जैन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह वाहतूक, निवास, भोजन आणि सुरक्षा यासंबंधित सर्व उपसमित्यांचे अधिकारी उपस्थित होते.








