- मराठी भाषा, संस्कृती आणि सीमावासीयांच्या न्यायहक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी
धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या या संमेलनात सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांनाही प्रभावीपणे वाचा फोडण्यात आली.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांचे दर्शन घडले. यावेळी बोलताना आमदार कैलासदादा पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या जतनासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामूहिक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सीमावासीयांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
संमेलनाच्या समारोप सत्रात आयोजित काव्यमैफलीने विशेष लक्ष वेधून घेतले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. काव्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या काव्यमैफलीत अखिल भारतीय साहित्य परिषद, कर्नाटक राज्य शाखेच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील १२ आणि बिदर जिल्ह्यातील ५ कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. त्यांच्या कवितांमधून सीमाभागातील मराठी समाजाच्या भावना, संघर्ष, अस्मिता आणि अपेक्षा यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.
कर्नाटक राज्याध्यक्ष तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सादर केलेल्या ‘माय’ आणि ‘लढा’ या कवितांना विशेष प्रतिसाद मिळाला. ‘माय’ या कवितेत महाराष्ट्र आणि सीमाभागातील नाते भावनिक स्वरूपात मांडण्यात आले, तर ‘लढा’ या कवितेत न्याय, स्वाभिमान आणि अस्मितेसाठी सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
याशिवाय किरण पाटील, रोशनी हुंद्रे, अपर्णा पाटील, संजीवनी खंडागळे, स्मिता आळतेकर, अशोक सुतार, चंद्रशेखर गायकवाड, पूजा सुतार, मनीषा नाडगौडा आणि स्नेहल बर्डे यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवर आधारित कविता सादर केल्या.
सीमाभागातील कवी-कवयित्रींच्या सशक्त अभिव्यक्तीमुळे संमेलनात मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायाच्या लढ्याचा ठसा उमटला. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडण्याची आणि जनजागृती घडवून आणण्याची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







