- बेळगाव शहरासह ग्रामीण भागात उपक्रम
- अभ्यंगस्नानाची परंपरा जपण्याचा आणि दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
बेळगाव : दिवाळीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजप नेते धनंजय जाधव यांच्या पुढाकाराने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार सुगंधी उटण्याच्या पाकिटांचे मोफत वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटण्याचा वापर करण्याची पारंपरिक प्रथा कायम राहावी, तसेच समाजातील सर्व घटकांना सणाच्या आनंदात सहभागी होता यावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

दिवाळीतील अभ्यंगस्नानाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून, या दिवशी सुगंधी उटण्याचा वापर करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. ही परंपरा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी, या भावनेतून धनंजय जाधव यांनी उटण्याच्या पाकिटांचे वितरण करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाकिटांचे वाटप करण्यात आले.

प्रेम, विश्वास आणि आनंदाची देवाणघेवाण हे दिवाळीचे खरे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक कुटुंबाला सणाचा आनंद घेता यावा आणि पारंपरिक प्रथा जपल्या जाव्यात, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.







