- जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी आढावा बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी २६ जानेवारी रोजी होणारा प्रजासत्ताक दिन कोणतीही त्रुटी न ठेवता मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस स्वातंत्र्यसैनिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान प्लास्टिकच्या ध्वजांच्या वापरावर बंदी घालावी, तसेच जिल्हा स्टेडियमकडे जाणाऱ्या बससेवा वाढवाव्यात, अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या. यावर बोलताना जिल्हाधिकारी रोशन यांनी पर्यावरणपूरक, कापडी ध्वजांचा वापर करण्याचे आवाहन केले आणि प्लास्टिकचे ध्वज टाळण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये विद्युत रोषणाईने सजवावीत, असे निर्देश त्यांनी दिले. समारंभ यशस्वीपणे पार पडावा यासाठी सर्व विभागांना ठोस जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन पोलीस अधीक्षक रामराजन के. यांनीही नागरिकांना लोकाभिमुख सेवा देण्याचे आश्वासन देत, यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
या बैठकीस स्वातंत्र्यसैनिक कलघटगी, दलित नेते मल्लेश चौगुले, विकास कलघटगी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.








