- भूतानमध्ये दाखवणार दमदार कामगिरी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तीन शरीरसौष्ठवपटूंची निवड झाली आहे. भूतानमधील थिंपू येथे ३० जून ते ४ जुलैदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रशांत खन्नूकर, प्रताप कालकुंद्रीकर आणि महिला गटातून केतकी पाटील भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल हायलॉक ग्रुपच्या वतीने तिन्ही खेळाडूंचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी हायलॉक ग्रुपचे संचालक दिलीप चिटणीस, कर्नाटक शरीर सौष्ठव संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनाथ, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर, सचिव हेमंत हावळ तसेच पदाधिकारी सुनील राऊत, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, नागराज कोलकार आणि गणेश गुंडप उपस्थित होते.
बेळगावच्या तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी झालेली निवड ही जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब मानली जात असून, त्यांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.








